आता वंदू सकळ सभा। जये सभेसी मुक्ति सुल्लभा। जेथें स्वयें जगदीश उभा।
तिष्ठतु भरें॥
सभा करणे, एकत्र येऊन चर्चा करणे, अनुभवांचे आदानप्रदान करणे यांमुळे
वास्तवाचे भान अधिक प्रगल्भ होते. उपनिषद म्हणजे जवळ बसणे. सगळेच उपनिषद जिवनानुभव
सांगतात. एखादा जीवनानुभव जेव्हा सार्वत्रिक होतो, सर्वसामान्यांना पडलेल्या
प्रश्नांचे उत्तर जेव्हा सापडते आणि या अनुभवाचा, उत्तरांचा जेव्हा विचार स्पष्ट होतो,
त्या प्रश्नोत्तरांची मांडणी स्पष्ट होते तेव्हा आपल्यात संरचनात्मक बदल घडतो.
यातून उपनिषद घडते. कल्पना अशी आहे की प्रत्येकाचे आयुष्य हे एक उपनिषद आहे.
आपल्यापुरते आपल्याला काही उत्तर मिळाले आहे जे आपण जगतो आहोत. जीवन जगत असतांना
प्रत्येकवेळी चर्चा, विचारविनिमय करून निर्णय घेणे आणि कृती करणे शक्य नाही.
त्यामुळे एकीकडे जीवन जगायचे आणि दुसरीकडे वेळातवेळ काढून आपण घेतलेल्या निर्णयांचा
उहापोह इतरांबरोबर करायचा. एखादे उत्तर योग्य वाटते तर एखादे अयोग्य. यात चूक अथवा
बरोबर काहीच नसते कारण अनेकविध कारणांच्या प्रभावाखाली आपण आपले निर्णय घेत असतो.
त्या त्या वेळी निर्णय काय झाला व कृती काय झाली आणि अनुभव काय आला हे सतत पडताळून
पाहायचे असते. या सगळ्यासाठी सभा आवश्यक आहे.
समर्थांची ही ओवी आहे. मुक्तीसाठी एकत्र आलेल्यांची म्हणजेच अध्यात्म
चर्चा करण्यासाठी ही सभा एकत्र आली आहे. अशा सभेत जगदीश स्वत: हजर असतो. जगत+ईश.
सर्व जग पाहणारा तो जगदीश. असा हा जगदीश तिष्ठत उभा असतो. संस्कृतमध्ये तिष्ठणे म्हणजे
उभे राहणे. मात्र मराठी मध्ये तिष्ठणे म्हणजे खोळंबणे, वाट पाहत राहणे. येथे
संस्कृतातला अर्थ अधिक योग्य वाटतो.
भक्तिचा
अभ्यास करण्यासाठी जे मुमुक्षत्व लागते ते अशा सभांतून सहभागी होऊन मिळते. सभांतून
आपण मुनि होतो. मननात मुनि:। जे मनन करतात ते मुनि. अर्थात अध्यात्म हा श्रद्धेच
विषय नसून बुद्धीचा विषय आहे.
No comments:
Post a Comment