Tuesday 22 November 2011

तूं आम्हां सोयरा सज्जन सांगाती। तुज मज प्रीती चालो सदा। तूं माझा जिव्हाळा जीवाचा जिवलग। होसी अंतरंग अंतरींचा।


तूं आम्हां सोयरा सज्जन सांगाती। तुज मज प्रीती चालो सदा।

तूं माझा जिव्हाळा जीवाचा जिवलग। होसी अंतरंग अंतरींचा।

गणगोत मित्र तूं माझे जीवन। अनन्य शरण तुझ्या पायीं।

तुका म्हणे सर्वगुणे तुझा दास। आवडे अभ्यास सदा तुझा॥



अभंग या काव्यरूपाला मराठीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा एक खास मराठी छंद आहे. ओवी आणि अभंग हे दोन्ही मराठी छंद एकरूपच आहेत. ओवी हे या दोन्ही छंदप्रकारांचे मूळ रूप असून अभंग हे ओवीचेच मालात्मक रूप आहे. तेराव्या शतकातील कानडी कवी चौंडरस हा विठ्ठलाला अभंग-विठ्ठल असे म्हणतो. 
संत नामदेवाने अभंग-कलेविषयी म्हटले आहे, ते असे -

अभंगाची कळा नाही मी नेणत। त्वरा केली प्रीत केशीराजे।

अक्षरांची संख्या बोलिले उदंड। मेरू सुप्रचंड शर आदीं।

सहा साडेतीन चरण जाणावे। अक्षरें गोजावीं चौक चारी॥

पहिल्यापासोनी तिसर्‍यापर्यंत। अठरा गणित मोज आलें।

चौक चारी आधीं बोलिलें मातृका। बाविसाची संख्या शेवटील॥

दीड चरणाचे दीर्घ ते अक्षर। मुमुक्ष विचार बोध केला॥

नामा म्हणे मज स्वप्न दिलें हरी। प्रीतीने खेचरी आज्ञा केली॥

अर्थात अभंग ही बावीस अक्षरसंख्या असलेली दीर्घ-प्रचुर रचना आहे, असे नामदेवाचे मत होतेसे दिसते. बाव्वीस अक्षरांचे साडेतीन भाग. या भागालाच नामदेव चरण म्हणत आहे. तीन भागांची अठरा अक्षरे व पुढच्याची चार अक्षरे मिळून बाव्वीस अक्षरे एका चौका असतात. असे बाव्वीस अक्षरी (साडेतीन) चरण सहा झाले, म्हणजे अभंग होतो. हा झाला मोठा अभंग. लहान अभंगाविषयी नामदेव म्हणतो -

मुख्य मातृकांची संख्या। सोळा अक्षरे नेटक्या॥

समचरणी अभंग। नव्ही ताल-छंदो-भंग॥

चौक पुलिता विसर्ग। गण यति लघु दीर्घ॥
जाणे एखादा निराळा। नामा म्हणे तो विरळा॥

अर्थात सोळा अक्षरे असलेल्या दोन (सम-) चरणांवर उभा असलेला हा अभंग कधीही ताल-छंदोभंग पावत नाही. उलट इतर रचनांतील गण, यती, लघू, दीर्घ, विसर्ग, वगैरे गोष्टी भानगडीच्या आहेत व त्या जाणणारा कोणी वेगळाच असतो.

वरील अभंग तुकाराम महाराजांचा आहे. महाराजांची परमेश्वर संकल्पना आणि त्या परमेश्वराशी त्यांचे असलेले नाते इतर संतांपेक्षा फार वेगळे होते. आपल्या आराध्याशी त्यांचे नाते कसे होते हे या अभंगातून स्पष्ट होते. या अभंगतील  शेवटचा चरण महत्त्वाचा आहे. माझी प्रीती अशी आहे की मला सतत तुझा अभ्यास करत राहावे असे वाटते. आपल्याकडे प्रीती आणि अभ्यासाची सांगड घालणारे फार म्हणजे फारच कमी लोक आहेत. पहिले कामसूत्राचे रचयिते वात्स्यायन आणि दुसरे तुकाराम महाराज. प्रीती, अनुराग या संकल्पना जगभरात खूप अभ्यासल्या गेल्या आहेत. ही भावना नेमके काय आहे, कशामुळे आहे इत्यादि प्रश्नांचा खूप विविधांगी विचार झालेला आहे. मात्र त्या सगळ्या अभ्यासात जो अतिशय वेगळा विचार मांडला आहे तो या दोघांनी.

प्रीतीने मनुष्याच्या वास्तवात आमूलाग्र बदल घडतो. त्याचा दृष्टिकोन, विचारसरणी इत्यादी आमूलाग्र बदलतात. त्याचे स्वत:शी आणि इतरांशी असलेले नाते बदलते. प्रीतीमुळे चित्त विलक्षण एकाग्र होते. प्रीतीचा असा परिणाम होत असता अर्थातच त्यावर अनेक सामाजिक निर्बंध आहेत. त्या त्या समाजाचा प्रीतीचा अनुभव काय आहे यावरून स्त्री पुरुष संबंध, आई-बात आणि अपत्य यांचे संबंध, नात्यांमधील कर्तव्याची जाण, रूपरेखा हे सगळे ठरते. देशप्रेम, समाजप्रेम इत्यादि सुद्धा समाजाच्या प्रीती बाबतच्या कल्पनांतून साकार होतांना दिसते.

तुकाराम या अभंगात म्हणतात प्रीतीची उत्कटता सिद्ध होते आहे जेव्हा प्रियकराला आपल्या प्रीयाचा अभ्यास करावा, तोही सतत करावा, असे वाटते.

चालावा जगाचा प्रवाह। व्हावा निसर्गगुणांचा निर्वाह। यासाठीच योजिता विवाह। धर्मज्ञांनी तयांचा॥


चालावा जगाचा प्रवाह। व्हावा निसर्गगुणांचा निर्वाह। 
यासाठीच योजिता विवाह। धर्मज्ञांनी तयांचा॥

स्त्री आणि पुरुष यांच्या संबंधांबाबत जगातील विचारवंतांनी खूप उहापोह केला आहे. त्यात विवाह ही संस्था खूप चर्चिली
गेली आहे. याचा खरच उपयोग आहे? असल्यास काय? विवाह हे केवळ एक लोंढे आहे. एक अशी संस्था ज्यातून कायदेशीर आणि समाजाला रुचेल अशा पद्धतीने मैथुन साधता येते असा एक युक्तिवाद आहे. याउलट विवाहाचे बंध थेट स्वर्गात तयार होतात असाही एक युक्तिवाद आहे. तुकडोजी महाराज म्हणतात स्त्री पुरुष हे दोन चाके जर परस्पर सहाय्यता करीत असतील तरच संसार-रथ 'कौतुके' चालेल आणि आदर्श ग्राम अथवा समाज
निर्मान होईल. मात्र झाले आहे भलतेच. या व्यवस्थेची हेळसांड झाली आहे, विवाहाची रुढीच बनली आणि यातून समाजात हजारो दु:खे जन्माला आली. महाराजांचा काळ पाहता हा विचार खूप आधुनिक म्हणावा लागेल. आजही हा विचार समाजातील किती लोकांना पटेल? विवाह कशासाठीतर जग प्रवाही असावे आणि निसर्गगुणांचा निर्वाह व्हावा यासाठी. जग प्रवाही असणे म्हणजे काय? याचा आपल्या समाजाच्या संरचनेवर
काय परिणाम होईल? खरोखरच आपला समाज 'प्रवाही' आहे असे म्हणता येईल काय

यासाठी एकचि उपाय। आपण न ठेवावे अलग ठाय। त्यांच्यात जावे मिळोनि निर्भय। समुदाय साधाया॥


यासाठी एकचि उपाय। आपण न ठेवावे अलग ठाय।
त्यांच्यात जावे मिळोनि निर्भय। समुदाय साधाया॥

भारतीय समाज म्हणजे अनेक संप्रदाय, विचारसरणी, पूजा पद्द्यती, आदर्शांची रेलचेल. त्यांतून संघर्ष निर्माण होत असतात. हे जोपर्यंत
एक होत नाहीत तोपर्यंत संघटन कसे व्यायचे? तर तुकडोजी महाराज म्हणतात याची सुरुवात आपल्या स्वत:पासून केली पाहिजे. आपणच जर वैविध्याचा तिरस्कार केला, आपले आणि परके मानले, जे वेगळे आहे त्याचे भय मानले तर संघटन होणार कसे? म्हणून एकमेव उपाय हा कि आपण वैविध्याचे भय न मानता त्याचे कौतुक करणे, त्यात सम्मिलित होणे आणि सरते शेवटी समुदाय म्हणजेच संघटन साधणे. हा विचार माध्यमांतून
होतांना दिसतो काय? पत्रकार वैविध्याचे कौतुक करतांना दिसतात, त्यात सहभागी होऊन त्यातील वैशिष्ट्ये दाखवतांना दिसतात काय कि केवळ एक दुसर्‍यातील फरक दाखवतात?

संघटनेने काय नोहे? बिंदु मिळता सिंधूपणा ये। गावचा बाग बहरोनि जाय । फुलाफळांनी संघटनेच्या॥


संघटनेने काय नोहे? बिंदु मिळता सिंधूपणा ये। 
गावचा बाग बहरोनि जाय । फुलाफळांनी संघटनेच्या॥

ओवी या काव्य प्रकाराचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या ग्राम गीतेत केला आहे. या गीतेची सुरुवात करत असतांना तुकडोजी महाराजा आह्वान करतात ते विश्वचालकाला, जगद्वंद्या
ब्रह्मांडनायकाला. आपले तत्त्वज्ञान हे संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी आहे. हे विश्वचि माझे घर असा विचार रुजवणे हा संतकवींचा एक विशेष आहे. सर्वांचा एकच देव असतो की एक देव सर्वांचा असतोया दोन्ही विचारांत खूप अंतर आहे. त्यातून येणार्‍या भूमिकेतही मग तसेच अंतर पडत जाते. भारतीय तत्त्वज्ञानात  सर्वांचा देव एकच असतो अशी कल्पना रुजत गेली.
ग्रामगीता 41 अध्यायांची आहे.
त्यातील ग्रामरक्षण या अध्यायातील वरील ओवी आहे. संघटनेने एकाचे अनेक होतात हे सांगण्यासाठी बिंदु ते सिंधू ही उपमा वापरली आहे. तुकडोजी महारांच्या विचारांत बागेची उपमा अनेकदा येते.

माधुर्यी मधुरता। शृंगारी सुरेखता। रुढपण उचितां। दिसे भले॥


माधुर्यी मधुरता। शृंगारी सुरेखता। 
रुढपण उचितां। दिसे भले॥

माउलींनी जो ग्रंथ, म्हणजे गीता, निरूपणाला घेतला आहे त्याचे स्वरूप येथे सांगितले आहे. रचनेतील माधुर्य आणि सुरेलपणा येथे पाहायला मिळतो. ही ओवी म्हणून
पाहावी. 
गोडीचा गोडपणा, शृंगाराचा सुरेखपणा व योग्य वस्तूंना आलेला रूढपणा यापासूनच (हा ग्रंथ) चांगला दिसू लागला. हा ओव्यांचा एक संग्रह म्हणजे गीतेचे माउलींनी केलेले केवळ कौतुक. प्रत्येक उदाहरणात माउली त्या ग्रंथाचे एक एक वैशिष्ट्य स्पष्ट करत जाते. माउलींनी गीता हाच ग्रंथ निरुपणासा
ठी का निवडले याचे संपूर्ण विवेचन या
ओव्यांमध्ये आहे.

एके हाती दंतु। जो स्वभावता खंडितु। तो बौद्धमतसंकेतु। वार्तिकांचा॥


एके हाती दंतु। जो स्वभावता खंडितु। 
तो बौद्धमतसंकेतु। वार्तिकांचा॥


ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला गणपतीच्या रूपाचे वर्णन करत असतांना माउली भारतीय तत्त्वज्ञानातील जी महत्त्वाची अंगे आहेत त्यांचा उहापोह करते. हे वर्णन सर्वच बाबतीत सुंदर आहे. येथे गणपतीच्या हातातील अर्धा तुटलेला दात हा स्वभावत: खंडन करणारा आहे आहे असे म्हटले आहे. माउलींच्या काळापर्यंत भारतीय तत्त्वज्ञानाने जगण्याच्या सर्व पैलूंवर अनेकपदरी विचार मांडले होते. त्या सर्व विचारसरणींचा, मतप्रवाहांचा माउलींचा अभ्यास होता. द्वताद्वैत वादाला बौद्धांनी शून्यवादाने प्रत्युत्तर दिले म्हणजेच त्याचे खंडन केले. बौद्ध मताचे निदर्शन करणार्‍या बौद्ध वार्तिकांनी प्रतिपादलेले बौद्धमत हाच कोणी स्वभावत: खंडित असलेला दांत तो पातंजलदर्शनरूपी एका हातात धरला आहे असे माउली येथे रूपक मांडते. पुढे त्या बौद्धमताचे खंडन झाल्यावर सहजच येणारा निरीश्वर सांख्यांचा सत्कारवाद हाच गणपतीचा वर देणारा कमलासारखा हात व जैमिनिकृत धर्मसूत्रे हा धर्माची सिद्धि करणारा व अभय देणारा गणपतीचा आहे असे निरूपण माउली करते.
भारतीय तत्त्वज्ञान समजून घेतांना कुठल्या मतांचा विचार करावा, त्यांची सांगड कशी घालावीहे माउली वीस ओव्यांमधे ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला सांगते. या वीस ओव्या कळल्या तर भारतीय तत्त्वज्ञान समजते असे म्हणता येईल. महत्त्वाचे म्हणजे येथे कोठेही हिन्दू हा शब्दप्रयोग नाही!

तरी ज्ञानयज्ञु तो एवंरूपु। तेथ आदिसंकल्पु हा यूपु। महाभूतें मंडपु। भेदु तो पशु।


तरी ज्ञानयज्ञु तो एवंरूपु। तेथ आदिसंकल्पु हा यूपु। 
महाभूतें मंडपु। भेदु तो पशु।
ज्ञानयज्ञ कसा आहे याचे रूपकांतून निरुपण माउली येथे करीत आहे. ज्ञानाच्या बाबतीत जगभरातील तत्त्वज्ञान्यांनी विविध मते मांडली आहेत. याचे कारण पूर्वापार पासून ज्ञानाचे स्वरूप काय आहे, ज्ञान कशाला म्हणावे याबाबत मत भिन्नता आहे. माध्यमांची सध्याची अवस्था ही त्या दृष्टीने अपरिपक्व आहे कारण ज्ञान आणि माहिती यात माध्यमे माहिती अमाप देत आहेत मात्र तेवढेच ज्ञानही देत आहेत असे म्हणता येणार नाही. परंतु ज्ञानाची व्याख्या जर त्या त्या समाजाची वेगवेगळी असेल तर ते ज्ञान द्यावे तरी कसे? आपल्या शिकण्याच्या आणि शिकवण्याच्या पद्धतीतही ज्ञानाच्या बाबतीत संभ्रम, संदिग्धता दिसते काय?

माउली म्हणते ज्ञानयज्ञामध्ये मूळ संकल्प हा पशु किंवा यूपु बांधावयाचा खांब आहे; पंच महाभूतें हा मांडव आहे व द्वैत हा पशु आहे. त्यापुढे पंच महाभूतांचे जे शब्दस्पर्शादि विशेषे गुण, अथवा इंद्रिये व प्राण, हीच यज्ञाची साहित्यसामग्री असून, अज्ञान हे तूप आहे. तेथे मन व बुद्धि या कुंडांत प्रज्वलित ज्ञानरूपी अग्नि असून, सुखदु:खादि इंद्रांविषयी जी चित्ताची समता, ती वेदी. आत्मानात्मविचार करण्याविषयींची जी बुद्धीची कुशलता, तीच मंत्रविद्येची शोभा आहे. शांति ही स्रुक्स्रुवा नावांची यज्ञपात्रे आहेत व जीव हा यज्ञ करणारा आहे.

एथ वडील जें जें करिती। तया नाम धर्मु ठेविती। तेंचि येर अनुष्ठिती। सामान्य सकळ॥


एथ वडील जें जें करिती। तया नाम धर्मु ठेविती।
 तेंचि येर अनुष्ठिती। सामान्य सकळ॥

इथे म्हणजे या लोकी, या मनुष्य लोकी, या लोकात जेथे मनुष्यांचा वास आहे. येथे वडील लोक म्हणजेच समाजात ज्यांना आदर, प्रतिष्ठा, प्रेम इत्यादी दिले जाते ते. असे वडील जे जे करतात त्यालाच सामान्य लोक, सामान्य सकळ, धर्म असे म्हणतात. अशा वडील लोकांचे आचार आणि विचार यांचे अनुष्ठान केले जाते, म्हणजेच त्यांचे आचार आणि विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न सामान्य जन करतात. म्हणूनच धर्म या संकल्पनेशी वैचारिक, भावनिक, आचार इत्यादी सर्व पातळींवर भिडावे लागते. त्याचबरोबर धर्म सदैव बदलणारा असला पाहिजे. याचे कारण आजचे वडील हे उद्याचेही वडील असतीलच असे नाही. सांप्रत समाजात वडील कोण असतील हे ठरविण्यात माध्यमांचे योगदान काय व किती आहे