तूं आम्हां सोयरा सज्जन सांगाती। तुज मज प्रीती चालो सदा।
तूं माझा जिव्हाळा जीवाचा जिवलग। होसी अंतरंग अंतरींचा।
गणगोत मित्र तूं माझे जीवन। अनन्य शरण तुझ्या पायीं।
तुका म्हणे सर्वगुणे तुझा दास। आवडे अभ्यास सदा तुझा॥
अभंग या काव्यरूपाला मराठीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा एक खास मराठी छंद आहे. ओवी आणि अभंग हे दोन्ही मराठी छंद एकरूपच आहेत. ओवी हे या दोन्ही छंदप्रकारांचे मूळ रूप असून अभंग हे ओवीचेच मालात्मक रूप आहे. तेराव्या शतकातील कानडी कवी चौंडरस हा विठ्ठलाला अभंग-विठ्ठल असे म्हणतो.
संत नामदेवाने अभंग-कलेविषयी म्हटले आहे, ते असे -
अभंगाची कळा नाही मी नेणत। त्वरा केली प्रीत केशीराजे।
अक्षरांची संख्या बोलिले उदंड। मेरू सुप्रचंड शर आदीं।
सहा साडेतीन चरण जाणावे। अक्षरें गोजावीं चौक चारी॥
पहिल्यापासोनी तिसर्यापर्यंत। अठरा गणित मोज आलें।
चौक चारी आधीं बोलिलें मातृका। बाविसाची संख्या शेवटील॥
दीड चरणाचे दीर्घ ते अक्षर। मुमुक्ष विचार बोध केला॥
नामा म्हणे मज स्वप्न दिलें हरी। प्रीतीने खेचरी आज्ञा केली॥
अर्थात अभंग ही बावीस अक्षरसंख्या असलेली दीर्घ-प्रचुर रचना आहे, असे नामदेवाचे मत होतेसे दिसते. बाव्वीस अक्षरांचे साडेतीन भाग. या भागालाच नामदेव चरण म्हणत आहे. तीन भागांची अठरा अक्षरे व पुढच्याची चार अक्षरे मिळून बाव्वीस अक्षरे एका चौका असतात. असे बाव्वीस अक्षरी (साडेतीन) चरण सहा झाले, म्हणजे अभंग होतो. हा झाला मोठा अभंग. लहान अभंगाविषयी नामदेव म्हणतो -
मुख्य मातृकांची संख्या। सोळा अक्षरे नेटक्या॥
समचरणी अभंग। नव्ही ताल-छंदो-भंग॥
चौक पुलिता विसर्ग। गण यति लघु दीर्घ॥
जाणे एखादा निराळा। नामा म्हणे तो विरळा॥
अर्थात सोळा अक्षरे असलेल्या दोन (सम-) चरणांवर उभा असलेला हा अभंग कधीही ताल-छंदोभंग पावत नाही. उलट इतर रचनांतील गण, यती, लघू, दीर्घ, विसर्ग, वगैरे गोष्टी भानगडीच्या आहेत व त्या जाणणारा कोणी वेगळाच असतो.
वरील अभंग तुकाराम महाराजांचा आहे. महाराजांची परमेश्वर संकल्पना आणि त्या परमेश्वराशी त्यांचे असलेले नाते इतर संतांपेक्षा फार वेगळे होते. आपल्या आराध्याशी त्यांचे नाते कसे होते हे या अभंगातून स्पष्ट होते. या अभंगतील शेवटचा चरण महत्त्वाचा आहे. माझी प्रीती अशी आहे की मला सतत तुझा अभ्यास करत राहावे असे वाटते. आपल्याकडे प्रीती आणि अभ्यासाची सांगड घालणारे फार म्हणजे फारच कमी लोक आहेत. पहिले कामसूत्राचे रचयिते वात्स्यायन आणि दुसरे तुकाराम महाराज. प्रीती, अनुराग या संकल्पना जगभरात खूप अभ्यासल्या गेल्या आहेत. ही भावना नेमके काय आहे, कशामुळे आहे इत्यादि प्रश्नांचा खूप विविधांगी विचार झालेला आहे. मात्र त्या सगळ्या अभ्यासात जो अतिशय वेगळा विचार मांडला आहे तो या दोघांनी.
प्रीतीने मनुष्याच्या वास्तवात आमूलाग्र बदल घडतो. त्याचा दृष्टिकोन, विचारसरणी इत्यादी आमूलाग्र बदलतात. त्याचे स्वत:शी आणि इतरांशी असलेले नाते बदलते. प्रीतीमुळे चित्त विलक्षण एकाग्र होते. प्रीतीचा असा परिणाम होत असता अर्थातच त्यावर अनेक सामाजिक निर्बंध आहेत. त्या त्या समाजाचा प्रीतीचा अनुभव काय आहे यावरून स्त्री पुरुष संबंध, आई-बात आणि अपत्य यांचे संबंध, नात्यांमधील कर्तव्याची जाण, रूपरेखा हे सगळे ठरते. देशप्रेम, समाजप्रेम इत्यादि सुद्धा समाजाच्या प्रीती बाबतच्या कल्पनांतून साकार होतांना दिसते.
तुकाराम या अभंगात म्हणतात प्रीतीची उत्कटता सिद्ध होते आहे जेव्हा प्रियकराला आपल्या प्रीयाचा अभ्यास करावा, तोही सतत करावा, असे वाटते.
No comments:
Post a Comment