एके हाती दंतु। जो स्वभावता खंडितु।
तो बौद्धमतसंकेतु। वार्तिकांचा॥
ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला गणपतीच्या रूपाचे वर्णन करत असतांना माउली भारतीय तत्त्वज्ञानातील जी महत्त्वाची अंगे आहेत त्यांचा उहापोह करते. हे वर्णन सर्वच बाबतीत सुंदर आहे. येथे गणपतीच्या हातातील अर्धा तुटलेला दात हा स्वभावत: खंडन करणारा आहे आहे असे म्हटले आहे. माउलींच्या काळापर्यंत भारतीय तत्त्वज्ञानाने जगण्याच्या सर्व पैलूंवर अनेकपदरी विचार मांडले होते. त्या सर्व विचारसरणींचा, मतप्रवाहांचा माउलींचा अभ्यास होता. द्वताद्वैत वादाला बौद्धांनी शून्यवादाने प्रत्युत्तर दिले म्हणजेच त्याचे खंडन केले. बौद्ध मताचे निदर्शन करणार्या बौद्ध वार्तिकांनी प्रतिपादलेले बौद्धमत हाच कोणी स्वभावत: खंडित असलेला दांत तो पातंजलदर्शनरूपी एका हातात धरला आहे असे माउली येथे रूपक मांडते. पुढे त्या बौद्धमताचे खंडन झाल्यावर सहजच येणारा निरीश्वर सांख्यांचा सत्कारवाद हाच गणपतीचा वर देणारा कमलासारखा हात व जैमिनिकृत धर्मसूत्रे हा धर्माची सिद्धि करणारा व अभय देणारा गणपतीचा आहे असे निरूपण माउली करते.
भारतीय तत्त्वज्ञान समजून घेतांना कुठल्या मतांचा विचार करावा, त्यांची सांगड कशी घालावी, हे माउली वीस ओव्यांमधे ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला सांगते. या वीस ओव्या कळल्या तर भारतीय तत्त्वज्ञान समजते असे म्हणता येईल. महत्त्वाचे म्हणजे येथे कोठेही हिन्दू हा शब्दप्रयोग नाही!
No comments:
Post a Comment