नवविधा भजन बोलिलें। तेंचि पुढें प्रांजळ केलें। श्रोतीं अवधान दिधलें। पाहिजे आतां॥
भक्ती शब्द तीन प्रकारें सिद्ध होतो असे के.वि.बेलसरे लिहितात. भजनं भक्ति:, भागो भक्ति:, भंजनं भक्ति:. भजन म्हणजे रस घेणे, रसस्वादन करणे. आपल्याकडे नऊ रस सांगितले आहेत. रस्यत इति रस: = ज्याचा आस्वाद घेतला जातो तो रस. भरताचे नाट्यशास्त्र हा रसप्रिक्रियेचे स्वरूप सांगणारा पहिला ग्रंथ मानतात. पण भरताच्याही आधी द्रुहिण व वासुकी या दोन आचार्यांच्या दोन भिन्न रसपरंपरा होत्या असे डॉ ग.त्र्यं. देशपांडे यांनी म्हटले आहे.
विभावानुभावसंचारिसंयोगाद्रसनिष्पत्ति:
विभाव, अनुभाव व संचारी भाव यांच्या संयोगातून रसनिष्पत्ती होते. येथे निष्पत्ती म्हणजे अभिव्यक्ती, उत्पत्ती, पूर्णता अथवा परिपक्वता असा आहे. भाव हे स्थायिन अथवा व्यभिचारिन असतात. स्थायिन भाव आठ अथवा नऊ प्रकारचे असतात कारण रस हे आठ अथवा नऊ प्रकारचे असतात त्यानुसार स्थायी भाव ठरतात. व्यभिचारिन भाव तेहेत्तीस अथवा त्रेचाळीस असतात. विभाव: म्हणजे शरीराची अथवा मनाची विशिष्ट अवस्था. संचारणे अथवा संचरणे म्हणजे फिरणे, जाणे.
जे सर्वश्रेष्ठ आहे त्याची भक्ती करावी. आपल्याकडे तत्त्वज्ञानात परमेश्वर संकल्पिलेला आहे. तो कधी विष्णुरूप आहे, कधी शिवरूप आहे, कधी कोणा एखाद्या संत महात्म्याच्या रूपात आहे. मात्र भक्तीचा अधिकार आणि उपास्य निवडण्याचे बंधन कोणावरही नाही. आपल्याला हवी त्याची आपण भक्ती करू शकतो. भक्तीचे नऊ प्रकार सांगितले आहेत.
श्रवणं कीर्तनं विष्णो: स्मरणं पादसेवनम।
अर्चनं वन्दनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम॥
हे नऊ प्रकार वैष्णवांनी अथवा भागवत धर्मियांनी सांगितले आहेत म्हणून त्यात विष्णूचा उल्लेख आला आहे. मात्र आपल्या उपास्याची भक्ती करीत असतांना आपल्याला हे नऊ प्रकार अनुभवास येतात.
No comments:
Post a Comment