जन्म म्हणजे दु:खरूपी वृक्षाचा अंकुर होय. वासना जन्माचे बीज आहे. जगांतील दु:खाचे मूळ कारण तीच आहे. पण ती सूक्ष्म असते, गुप्त असते. जन्म तिचे दृश्य रूप होय. अंकुर हा आरंभ आहे. तो जसजसा वाढतो तसतसे त्यांतील दु:ख प्रगट रूप धारण करते. जन्म म्हणजे शोकाचा समुद्र आहे. सर्व काळी सर्व ऋतूंमध्ये समुद्र पूर्ण भरलेला असतो. त्याचप्रमाणे मानवी जीवन सर्व काली सर्व ठिकाणी दु:खाच्या खार्या पाण्याने भरलेले असते. जन्म म्हणजे कधींही न चळणारा भीतीचा डोंगर आहे. मानवीजीवनांत भय खोलवर रुतून बसलेले आहे. माणसाने कितीही प्रयत्न केले तरी जीवनांतील भय काही केल्या हालत नाही, मागे पुढे होत नाही, मग नाहीसे होण्याची गोष्ट तर दूरच राहते.
No comments:
Post a Comment