ऐका निवेदनाचें लक्षण। देवासि वाहावें आपण।
करावें तत्वविवरण। म्हणिजे कळे॥
मी भक्त ऐसें म्हणावें। आणी विभक्तपणेंचि भजावें।
हें आवघेंचि जाणावें। विलक्षण ॥
आपण स्वत:ला देवास वाहणे हे निवेदनाचे लक्षण आहे. तत्त्वांचे स्पष्ट विवेचन केले म्हणजे निवेदन काय हे कळते. देवाला वाहणे म्हणजे देवाला देऊन टाकणे. या देण्यामध्ये तीन गोष्टी असतात. एक, देवास देतांना आपण अत्यंत आदराने व प्रेमाने देतो. दोन, एकदां दिल्यानंतर त्या वस्तूवरील ममत्व, माझेपणाचा हक्क, आसक्ति आणि प्रीति आपण सर्वस्वी सोडतो आणि तीन त्या वस्तूला आपण विसरून जातो, पुढे तिचे काय झाले याचा विचार मनांतून काढून टाकतो. तत्त्वविवरण म्हणजे काय? आजचा आपला मी कशाचा बनलेला आहे हा शोध करीत जाऊन अखेर कोणती तत्त्वे उरतात ते पाहावे. ही तत्त्वे कळली की आपण स्वत: देवाला वाहावे म्हणजे काय करावे ते समजते.
No comments:
Post a Comment