Saturday, 18 February 2012

विचारेंविण बोलों नये। Vicharevina bolo naye

विचारेंविण बोलों नये। विवंचनेविण चालों नये। मर्यादेविण हालों नये। कांहीं येक॥
प्रीतीविण रुसो नये। चोरास वोळखी पुसो नये। रात्री पंथ क्रमू नये। येकायेकी॥
जनी आर्जव तोडू नये। पापद्रव्य जोडू नये। पुण्यमार्ग सोडू नये। कदाकाळी॥ 

विचार केल्याशिवाय बोलू नये, सर्व बाजू ध्यानांत घेतल्यावांचून काम सुरू करूं नये, नीतिधर्माच्या मर्यादा पाळल्यावांचून हालचाल करूं नये. प्रेम नसेल तेथे रुसू नये, चोराला ओळख विचारूं नये, रात्री एकटेपणे प्रवास करू नये. लोकांशी सरळपणाचे वागणे सोडो नये, पापमार्गाने द्रव्यसंचय करू नये, नीतिधर्माचा मार्ग कधी सोडू नये॥ 

Sunday, 12 February 2012

राव रंक ब्रह्मादिक। सकळांमधें वर्ते येक। Rav rank brahmadika


राव रंक ब्रह्मादिक। सकळांमधें वर्ते येक। नाना शरीरें चाळक। इंद्रियेंद्वारें॥

गरीब, श्रीमंत आणि ब्रह्मादिक देव या सगळ्यांच्या अंतर्यामी तोच एक राहून त्यांना चालवतो. इंद्रियांच्या मार्फत अनेक देहांचे व्यवहार तो चालवतो. हा तो म्हणजे सर्वांनामधे असलेला चंचळ स्वरूप कर्ता.

Saturday, 11 February 2012

एर्‍हवी ब्रह्मपणाचिये भडसे। न चुकतीचि पुनरावृत्तीचे वळसे। Erhavi brahmapanachiye bhadase


एर्‍हवी ब्रह्मपणाचिये भडसे। न चुकतीचि पुनरावृत्तीचे वळसे। परि निवटलियांचे जैसे। पोट न दुखे॥

सहज विचार करून पाहिले तर ब्रह्मपदाचा थोरपणा जरी प्राप्त झाला, तरी त्या व्यक्तीस पुन्हा पुन्हा येणारे जन्ममरणाचे फेरे चुकतच नाहीत. परंतु ज्या प्रमाणे मेलेल्या माणासाचे पोट दुखत नाही अथवा जागा झाल्यानंतर माणूस स्वप्नांतील महापुराने बुडत नाही; त्याप्रमाणे जे माझ्या स्वरूपी प्राप्त झाले, ते पुरुष संसारबंधनांत सांपडत नाहीत.

Friday, 10 February 2012

जन्म दु:खाचा अंकुर। जन्म शोकाचा सागर। Janma dukkhacha dongar


जन्म दु:खाचा अंकुर। जन्म शोकाचा सागर। जन्म भयाचा डोंगर। चळेना ऐसा॥

जन्म म्हणजे दु:खरूपी वृक्षाचा अंकुर होय. वासना जन्माचे बीज आहे. जगांतील दु:खाचे मूळ कारण तीच आहे. पण ती सूक्ष्म असते, गुप्त असते. जन्म तिचे दृश्य रूप होय. अंकुर हा आरंभ आहे. तो जसजसा वाढतो तसतसे त्यांतील दु:ख प्रगट रूप धारण करते. जन्म म्हणजे शोकाचा समुद्र आहे. सर्व काळी सर्व ऋतूंमध्ये समुद्र पूर्ण भरलेला असतो. त्याचप्रमाणे मानवी जीवन सर्व काली सर्व ठिकाणी दु:खाच्या खार्‍या पाण्याने भरलेले असते. जन्म म्हणजे कधींही न चळणारा भीतीचा डोंगर आहे. मानवीजीवनांत भय खोलवर रुतून बसलेले आहे. माणसाने कितीही प्रयत्न केले तरी जीवनांतील भय काही केल्या हालत नाही, मागे पुढे होत नाही, मग नाहीसे होण्याची गोष्ट तर दूरच राहते.

Friday, 3 February 2012

ऐका निवेदनाचे लक्षण Aika nivedanache lakshana


ऐका निवेदनाचें लक्षण। देवासि वाहावें आपण।
करावें तत्वविवरण। म्हणिजे कळे॥
मी भक्त ऐसें म्हणावें। आणी विभक्तपणेंचि भजावें।
हें आवघेंचि जाणावें। विलक्षण ॥
आपण स्वत:ला देवास वाहणे हे निवेदनाचे लक्षण आहे. तत्त्वांचे स्पष्ट विवेचन केले म्हणजे निवेदन काय हे कळते. देवाला वाहणे म्हणजे देवाला देऊन टाकणे. या देण्यामध्ये तीन गोष्टी असतात. एक, देवास देतांना आपण अत्यंत आदराने व प्रेमाने देतो. दोन, एकदां दिल्यानंतर त्या वस्तूवरील ममत्व, माझेपणाचा हक्क, आसक्ति आणि प्रीति आपण सर्वस्वी सोडतो आणि तीन त्या वस्तूला आपण विसरून जातो, पुढे तिचे काय झाले याचा विचार मनांतून काढून टाकतो. तत्त्वविवरण म्हणजे काय? आजचा आपला मी कशाचा बनलेला आहे हा शोध करीत जाऊन अखेर कोणती तत्त्वे उरतात ते पाहावे. ही तत्त्वे कळली की आपण स्वत: देवाला वाहावे म्हणजे काय करावे ते समजते.