Tuesday, 22 November 2011

यासाठी एकचि उपाय। आपण न ठेवावे अलग ठाय। त्यांच्यात जावे मिळोनि निर्भय। समुदाय साधाया॥


यासाठी एकचि उपाय। आपण न ठेवावे अलग ठाय।
त्यांच्यात जावे मिळोनि निर्भय। समुदाय साधाया॥

भारतीय समाज म्हणजे अनेक संप्रदाय, विचारसरणी, पूजा पद्द्यती, आदर्शांची रेलचेल. त्यांतून संघर्ष निर्माण होत असतात. हे जोपर्यंत
एक होत नाहीत तोपर्यंत संघटन कसे व्यायचे? तर तुकडोजी महाराज म्हणतात याची सुरुवात आपल्या स्वत:पासून केली पाहिजे. आपणच जर वैविध्याचा तिरस्कार केला, आपले आणि परके मानले, जे वेगळे आहे त्याचे भय मानले तर संघटन होणार कसे? म्हणून एकमेव उपाय हा कि आपण वैविध्याचे भय न मानता त्याचे कौतुक करणे, त्यात सम्मिलित होणे आणि सरते शेवटी समुदाय म्हणजेच संघटन साधणे. हा विचार माध्यमांतून
होतांना दिसतो काय? पत्रकार वैविध्याचे कौतुक करतांना दिसतात, त्यात सहभागी होऊन त्यातील वैशिष्ट्ये दाखवतांना दिसतात काय कि केवळ एक दुसर्‍यातील फरक दाखवतात?

संघटनेने काय नोहे? बिंदु मिळता सिंधूपणा ये। गावचा बाग बहरोनि जाय । फुलाफळांनी संघटनेच्या॥


संघटनेने काय नोहे? बिंदु मिळता सिंधूपणा ये। 
गावचा बाग बहरोनि जाय । फुलाफळांनी संघटनेच्या॥

ओवी या काव्य प्रकाराचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या ग्राम गीतेत केला आहे. या गीतेची सुरुवात करत असतांना तुकडोजी महाराजा आह्वान करतात ते विश्वचालकाला, जगद्वंद्या
ब्रह्मांडनायकाला. आपले तत्त्वज्ञान हे संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी आहे. हे विश्वचि माझे घर असा विचार रुजवणे हा संतकवींचा एक विशेष आहे. सर्वांचा एकच देव असतो की एक देव सर्वांचा असतोया दोन्ही विचारांत खूप अंतर आहे. त्यातून येणार्‍या भूमिकेतही मग तसेच अंतर पडत जाते. भारतीय तत्त्वज्ञानात  सर्वांचा देव एकच असतो अशी कल्पना रुजत गेली.
ग्रामगीता 41 अध्यायांची आहे.
त्यातील ग्रामरक्षण या अध्यायातील वरील ओवी आहे. संघटनेने एकाचे अनेक होतात हे सांगण्यासाठी बिंदु ते सिंधू ही उपमा वापरली आहे. तुकडोजी महारांच्या विचारांत बागेची उपमा अनेकदा येते.

माधुर्यी मधुरता। शृंगारी सुरेखता। रुढपण उचितां। दिसे भले॥


माधुर्यी मधुरता। शृंगारी सुरेखता। 
रुढपण उचितां। दिसे भले॥

माउलींनी जो ग्रंथ, म्हणजे गीता, निरूपणाला घेतला आहे त्याचे स्वरूप येथे सांगितले आहे. रचनेतील माधुर्य आणि सुरेलपणा येथे पाहायला मिळतो. ही ओवी म्हणून
पाहावी. 
गोडीचा गोडपणा, शृंगाराचा सुरेखपणा व योग्य वस्तूंना आलेला रूढपणा यापासूनच (हा ग्रंथ) चांगला दिसू लागला. हा ओव्यांचा एक संग्रह म्हणजे गीतेचे माउलींनी केलेले केवळ कौतुक. प्रत्येक उदाहरणात माउली त्या ग्रंथाचे एक एक वैशिष्ट्य स्पष्ट करत जाते. माउलींनी गीता हाच ग्रंथ निरुपणासा
ठी का निवडले याचे संपूर्ण विवेचन या
ओव्यांमध्ये आहे.

एके हाती दंतु। जो स्वभावता खंडितु। तो बौद्धमतसंकेतु। वार्तिकांचा॥


एके हाती दंतु। जो स्वभावता खंडितु। 
तो बौद्धमतसंकेतु। वार्तिकांचा॥


ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला गणपतीच्या रूपाचे वर्णन करत असतांना माउली भारतीय तत्त्वज्ञानातील जी महत्त्वाची अंगे आहेत त्यांचा उहापोह करते. हे वर्णन सर्वच बाबतीत सुंदर आहे. येथे गणपतीच्या हातातील अर्धा तुटलेला दात हा स्वभावत: खंडन करणारा आहे आहे असे म्हटले आहे. माउलींच्या काळापर्यंत भारतीय तत्त्वज्ञानाने जगण्याच्या सर्व पैलूंवर अनेकपदरी विचार मांडले होते. त्या सर्व विचारसरणींचा, मतप्रवाहांचा माउलींचा अभ्यास होता. द्वताद्वैत वादाला बौद्धांनी शून्यवादाने प्रत्युत्तर दिले म्हणजेच त्याचे खंडन केले. बौद्ध मताचे निदर्शन करणार्‍या बौद्ध वार्तिकांनी प्रतिपादलेले बौद्धमत हाच कोणी स्वभावत: खंडित असलेला दांत तो पातंजलदर्शनरूपी एका हातात धरला आहे असे माउली येथे रूपक मांडते. पुढे त्या बौद्धमताचे खंडन झाल्यावर सहजच येणारा निरीश्वर सांख्यांचा सत्कारवाद हाच गणपतीचा वर देणारा कमलासारखा हात व जैमिनिकृत धर्मसूत्रे हा धर्माची सिद्धि करणारा व अभय देणारा गणपतीचा आहे असे निरूपण माउली करते.
भारतीय तत्त्वज्ञान समजून घेतांना कुठल्या मतांचा विचार करावा, त्यांची सांगड कशी घालावीहे माउली वीस ओव्यांमधे ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला सांगते. या वीस ओव्या कळल्या तर भारतीय तत्त्वज्ञान समजते असे म्हणता येईल. महत्त्वाचे म्हणजे येथे कोठेही हिन्दू हा शब्दप्रयोग नाही!

तरी ज्ञानयज्ञु तो एवंरूपु। तेथ आदिसंकल्पु हा यूपु। महाभूतें मंडपु। भेदु तो पशु।


तरी ज्ञानयज्ञु तो एवंरूपु। तेथ आदिसंकल्पु हा यूपु। 
महाभूतें मंडपु। भेदु तो पशु।
ज्ञानयज्ञ कसा आहे याचे रूपकांतून निरुपण माउली येथे करीत आहे. ज्ञानाच्या बाबतीत जगभरातील तत्त्वज्ञान्यांनी विविध मते मांडली आहेत. याचे कारण पूर्वापार पासून ज्ञानाचे स्वरूप काय आहे, ज्ञान कशाला म्हणावे याबाबत मत भिन्नता आहे. माध्यमांची सध्याची अवस्था ही त्या दृष्टीने अपरिपक्व आहे कारण ज्ञान आणि माहिती यात माध्यमे माहिती अमाप देत आहेत मात्र तेवढेच ज्ञानही देत आहेत असे म्हणता येणार नाही. परंतु ज्ञानाची व्याख्या जर त्या त्या समाजाची वेगवेगळी असेल तर ते ज्ञान द्यावे तरी कसे? आपल्या शिकण्याच्या आणि शिकवण्याच्या पद्धतीतही ज्ञानाच्या बाबतीत संभ्रम, संदिग्धता दिसते काय?

माउली म्हणते ज्ञानयज्ञामध्ये मूळ संकल्प हा पशु किंवा यूपु बांधावयाचा खांब आहे; पंच महाभूतें हा मांडव आहे व द्वैत हा पशु आहे. त्यापुढे पंच महाभूतांचे जे शब्दस्पर्शादि विशेषे गुण, अथवा इंद्रिये व प्राण, हीच यज्ञाची साहित्यसामग्री असून, अज्ञान हे तूप आहे. तेथे मन व बुद्धि या कुंडांत प्रज्वलित ज्ञानरूपी अग्नि असून, सुखदु:खादि इंद्रांविषयी जी चित्ताची समता, ती वेदी. आत्मानात्मविचार करण्याविषयींची जी बुद्धीची कुशलता, तीच मंत्रविद्येची शोभा आहे. शांति ही स्रुक्स्रुवा नावांची यज्ञपात्रे आहेत व जीव हा यज्ञ करणारा आहे.

एथ वडील जें जें करिती। तया नाम धर्मु ठेविती। तेंचि येर अनुष्ठिती। सामान्य सकळ॥


एथ वडील जें जें करिती। तया नाम धर्मु ठेविती।
 तेंचि येर अनुष्ठिती। सामान्य सकळ॥

इथे म्हणजे या लोकी, या मनुष्य लोकी, या लोकात जेथे मनुष्यांचा वास आहे. येथे वडील लोक म्हणजेच समाजात ज्यांना आदर, प्रतिष्ठा, प्रेम इत्यादी दिले जाते ते. असे वडील जे जे करतात त्यालाच सामान्य लोक, सामान्य सकळ, धर्म असे म्हणतात. अशा वडील लोकांचे आचार आणि विचार यांचे अनुष्ठान केले जाते, म्हणजेच त्यांचे आचार आणि विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न सामान्य जन करतात. म्हणूनच धर्म या संकल्पनेशी वैचारिक, भावनिक, आचार इत्यादी सर्व पातळींवर भिडावे लागते. त्याचबरोबर धर्म सदैव बदलणारा असला पाहिजे. याचे कारण आजचे वडील हे उद्याचेही वडील असतीलच असे नाही. सांप्रत समाजात वडील कोण असतील हे ठरविण्यात माध्यमांचे योगदान काय व किती आहे

जैसें समुद्री लवण न पडे। तंव वेगळें अल्प आवडे। मग होय सिंधूचि एवढें। मिळे तेव्हां॥


जैसें समुद्री लवण न पडे। तंव वेगळें अल्प आवडे। 
मग होय सिंधूचि एवढें। मिळे तेव्हां॥

समुद्रात लवण म्हणजे मीठ पडत नाही तोपर्यंत ते मीठ एवढेसे वाटते. मात्र तेच आणि तेवढेसेच मीठ जेव्हा समुद्रात, सिंधूत पडते, तेव्हा ते
समुद्राएवढे होते. मोठे आणि लहान याबाबत आपल्यात खूप संभ्रम असतो. आपल्यापेक्षा मोठा नेमका कोण? लहान कोण? एकीकडे अमेरिका आणि दुसरीकडे चीन यांमध्ये आपण नेमके मोठे की लहान? त्याचबरोबर एखाद्यासारखे होणे वाईट की चांगले? अनुकरणानेच जर आपण शिकत असू तर एखाद्याचे अनुकरण करणे वाईट कसे असेल? अनुकरण हे अंधानुकरण नेमके कधी होते? अनुकरणाची सांस्कृतिक गरज असते काय? एखाद्या
संस्कृतीत अनुकरण करण्याला प्रोत्साहन दिले जाते तर एखाद्या संस्कृतीत अनुकरणाला वाईट मानले जाते? यात माध्यमांचा नेमका वापर कसा होतो?