Tuesday, 24 January 2012

भुजबल बिस्व बस्य करि Bhujbal bisva basya kari

भुजबल बिस्व बस्य करि राखेसि कौउ न सुतंत्र।
मंडलीक मनि रावन राज करइ निज मंत्र॥


आपल्या बाहूबलाने त्याने म्हणजे रावणाने सगळे विश्व आपल्या वश केले. कोणाचेच स्वातंत्र्य ठेवले नाही. अशा प्रकारे सर्वांनाच आपला मांडलिक करून रावण स्वेच्छेने राज्य करू लागला.




Monday, 23 January 2012

गुनह लखन कर हम पर रोषू Gunah lakhan kare ham para roshu

गुनह लखन कर हम पर रोषू। कतहुँ सुधाइहु ते बड दोषू॥
टेढ जानि सब बंदइ काहू। बक्र चंद्रमहि ग्रसइ न राहू॥
धनुष्य तुटला होता आणि आता सीतेशी रामाचा विवाह होणार इत्यक्यात तेथे परशुराम येतात. क्षत्रीयांना मारून टाकणे हेच त्यांनी आपले कार्य सिद्ध केले आहे. त्यामुळे समोर उभ्या असलेल्या राम आणि लक्ष्मणांना मारून टाकणे आलेच. पण आज ते का जमत नाहिए? त्यात लक्ष्मण आपल्याला हसतो आहे काय असे वाटते. त्यावर परशुराम मोठ्या भावाला म्हणजेच रामाला सुनावतात.. ते ऐकून राम मनातल्या मनात विचार करतो की गुन्हा केला लक्ष्मणाने आणि क्रोध माझ्यावर करताहेत. कधी कधी सरळ राहण्यात (सुधाइहु) दोष असतो हेच खरे. हा तिरका चालतो, विचार करतो असे पाहून लोक वंदन करतात. वक्री चंद्राला राहू ग्रासत नाही त्याप्रमाणे.



Sunday, 22 January 2012

स्वप्न आणि मनोरथ। मनोमात्रविलसित।

स्वप्न आणि मनोरथ। मनोमात्रविलसित। ते निद्रितासी सत्य पदार्थ। मिथ्या होत जागृती।
त्तैसें कामनेचेनि उल्हासें। इंद्रियांचेनि सौरसें। उभय भोगपिसें। नाथिलें वसे बुद्धीसी॥
शिंपी शिंपपणे असे। धनोलोभ्या रूपे भासे। तेवी विषयाचेनि अभिलाषे। भेदपिसे नसतेचि॥

स्वप्ने आणि मनोरथ हे दोन्ही मनाचेच खेळ आहेत. फक्त झोपेतच स्वप्न खरे भासते. आपण जागे झालो की ते खोटे ठरते. त्याचप्रमाणे इछेच्या तीव्र हौसेने आणि इंद्रियांच्या आसक्तीमुळे माणसाच्या बुद्धीला ह्या जगातील व परलोकातील भोग भोगण्याचे खोटेच वेड लागलेले असते. शिंपला जसा असतो तसाच न दिसता बालबुद्धीच्या माणसाला तेथे चांदी आहे असे वाटते. त्याच प्रमाणे विषयांच्या आसक्तीमुळे भेदबुद्धीचे, द्वैतबुद्धीचे वेड लागते. 

Saturday, 21 January 2012

तो श्यामसुंदर डोळसु।

तो श्याम सुंदर डोळसु। अंगा शोभला स्त्रीवेषु। प्रमदावैभवविलासु। दावी विन्यासु सलज्ज॥
नयनीं सोगयाचें काजळ। व्यंकटा कटाक्षें अतिचपल। सुंदर सुकुमार वेल्हाळ। चाले निश्चळ हंसगती॥

(सांबाचे) नेत्र सुंदर होते. तो सावळा सुंदर दिसत होता. त्याला स्त्रीवेष चांगला दिसत होता. त्यातच त्याला स्त्रियांसारखे हावभाव करण्याची कला येत होती. तो लाजून मुरकून स्त्रीसारखेच अंगविन्यास करू लागला. त्याने डोळ्यांत काजल घातले होते. त्याच्या भिवया सुरेख बाकदार होत्या. तो नाजूक व सुकुमार सांब हंसगतीने चालत गेला व इकडेतिकडे नेत्रसंकेत करू लागला.
हे वर्णन आहे श्रीएकनाथी भागवतात. यदुकुलातील तरुण खेळत होते. चेडू फेकून मारणे हा तो खेळ. अशावेळी तेथे काही ब्राह्मण आले. तरुणांनी त्यांची खोडी काढण्यासाठी त्यांच्यातील सांब या तरुणाला एका तरुणीचे रूप धारण करून त्या ब्राह्मणांसमोर उभे केले. ही तरुणी गरोदर आहे तेव्हा तिला मुलगा होणार की मुलगी ते सांगा असे विचारू लागले. त्यावेळेस नारदाने हे पाहिले आणि
मुंगिये निघालिया पांख। तिसी मरण ये अचुक। तेवीं ब्राह्मण छळणें देख। आवश्यक कुळनाश।
मुंगीचे पंख निघाले की तिचा मृत्यु ज्याप्रमाणे अटळ असतो त्याप्रमाणे ब्राह्मणांचा छळ केल्यास कुळनाश अटळ असतो असे नाथ महाराज नारदाकरवी म्हणतात.