Saturday, 21 January 2012

तो श्यामसुंदर डोळसु।

तो श्याम सुंदर डोळसु। अंगा शोभला स्त्रीवेषु। प्रमदावैभवविलासु। दावी विन्यासु सलज्ज॥
नयनीं सोगयाचें काजळ। व्यंकटा कटाक्षें अतिचपल। सुंदर सुकुमार वेल्हाळ। चाले निश्चळ हंसगती॥

(सांबाचे) नेत्र सुंदर होते. तो सावळा सुंदर दिसत होता. त्याला स्त्रीवेष चांगला दिसत होता. त्यातच त्याला स्त्रियांसारखे हावभाव करण्याची कला येत होती. तो लाजून मुरकून स्त्रीसारखेच अंगविन्यास करू लागला. त्याने डोळ्यांत काजल घातले होते. त्याच्या भिवया सुरेख बाकदार होत्या. तो नाजूक व सुकुमार सांब हंसगतीने चालत गेला व इकडेतिकडे नेत्रसंकेत करू लागला.
हे वर्णन आहे श्रीएकनाथी भागवतात. यदुकुलातील तरुण खेळत होते. चेडू फेकून मारणे हा तो खेळ. अशावेळी तेथे काही ब्राह्मण आले. तरुणांनी त्यांची खोडी काढण्यासाठी त्यांच्यातील सांब या तरुणाला एका तरुणीचे रूप धारण करून त्या ब्राह्मणांसमोर उभे केले. ही तरुणी गरोदर आहे तेव्हा तिला मुलगा होणार की मुलगी ते सांगा असे विचारू लागले. त्यावेळेस नारदाने हे पाहिले आणि
मुंगिये निघालिया पांख। तिसी मरण ये अचुक। तेवीं ब्राह्मण छळणें देख। आवश्यक कुळनाश।
मुंगीचे पंख निघाले की तिचा मृत्यु ज्याप्रमाणे अटळ असतो त्याप्रमाणे ब्राह्मणांचा छळ केल्यास कुळनाश अटळ असतो असे नाथ महाराज नारदाकरवी म्हणतात.




No comments:

Post a Comment