Monday, 12 December 2011

आता वंदू सकळ सभा। जये सभेसी मुक्ति सुल्लभा। जेथें स्वयें जगदीश उभा। तिष्ठतु भरें॥


सभा करणे, एकत्र येऊन चर्चा करणे, अनुभवांचे आदानप्रदान करणे यांमुळे वास्तवाचे भान अधिक प्रगल्भ होते. उपनिषद म्हणजे जवळ बसणे. सगळेच उपनिषद जिवनानुभव सांगतात. एखादा जीवनानुभव जेव्हा सार्वत्रिक होतो, सर्वसामान्यांना पडलेल्या प्रश्नांचे उत्तर जेव्हा सापडते आणि या अनुभवाचा, उत्तरांचा जेव्हा विचार स्पष्ट होतो, त्या प्रश्नोत्तरांची मांडणी स्पष्ट होते तेव्हा आपल्यात संरचनात्मक बदल घडतो. यातून उपनिषद घडते. कल्पना अशी आहे की प्रत्येकाचे आयुष्य हे एक उपनिषद आहे. आपल्यापुरते आपल्याला काही उत्तर मिळाले आहे जे आपण जगतो आहोत. जीवन जगत असतांना प्रत्येकवेळी चर्चा, विचारविनिमय करून निर्णय घेणे आणि कृती करणे शक्य नाही. त्यामुळे एकीकडे जीवन जगायचे आणि दुसरीकडे वेळातवेळ काढून आपण घेतलेल्या निर्णयांचा उहापोह इतरांबरोबर करायचा. एखादे उत्तर योग्य वाटते तर एखादे अयोग्य. यात चूक अथवा बरोबर काहीच नसते कारण अनेकविध कारणांच्या प्रभावाखाली आपण आपले निर्णय घेत असतो. त्या त्या वेळी निर्णय काय झाला व कृती काय झाली आणि अनुभव काय आला हे सतत पडताळून पाहायचे असते. या सगळ्यासाठी सभा आवश्यक आहे.
समर्थांची ही ओवी आहे. मुक्तीसाठी एकत्र आलेल्यांची म्हणजेच अध्यात्म चर्चा करण्यासाठी ही सभा एकत्र आली आहे. अशा सभेत जगदीश स्वत: हजर असतो. जगत+ईश. सर्व जग पाहणारा तो जगदीश. असा हा जगदीश तिष्ठत उभा असतो. संस्कृतमध्ये तिष्ठणे म्हणजे उभे राहणे. मात्र मराठी मध्ये तिष्ठणे म्हणजे खोळंबणे, वाट पाहत राहणे. येथे संस्कृतातला अर्थ अधिक योग्य वाटतो.
भक्तिचा अभ्यास करण्यासाठी जे मुमुक्षत्व लागते ते अशा सभांतून सहभागी होऊन मिळते. सभांतून आपण मुनि होतो. मननात मुनि:। जे मनन करतात ते मुनि. अर्थात अध्यात्म हा श्रद्धेच विषय नसून बुद्धीचा विषय आहे.

पदार्थेंविण संकेत। द्वैतावेगळा दृष्टांत। पूर्वपक्षेंविण सिद्धांत। बोलतांचि न ये।


तर्काने एखादा विषय समजावून द्यायचा असतो त्यावेलीत्या विषयावरील जे आक्षेप असतात त्यांचे वर्णन प्रथम क्रतात. त्यास पूर्वपक्ष म्हणतात. विरोधकांनी निर्माण केलेले आक्षेप फेडले म्हणजे आपला मुद्दा मांडण्याचा मार्ग मोकळा होतो. त्यास सिद्धांत म्हणतात.

पोहणारचि गुचक्या खातो। जनास कैसा काढूं पाहातो। आशय लोकांचा राहातो। ठाइं ठाइं॥

 
पोहणारा स्वत:च गटांगळ्या खातो आहे असा बुडत असलेल्या लोकांना काय बाहेर काढेल? त्याचप्रमाणे विषयाचे नीट आकलन नसलेला दुसर्‍यांना विषय सांगू शकणार नाही. त्याच्या भाषणात गोंधळ असतो आणि सरतेशेवटी लोकांच्या शंका तशाच राहून जातात.

घाली शास्त्रांची दडपण। प्रचितिविण निरूपण। पुसों जातां उगाच सीण। अत्यंत मानी॥


काही लोकांना विचित्र सवय असते. सतत कुठल्यातरी लेखक, विचारवंत इत्यादींची वाक्ये अथवा
विचार लोकांवर फेकायची. अशा व्यक्ती कुठलाही स्वानुभव नसतांना शास्त्रवचनांचा आधार
दाखवीत असतात. समर्थ म्हणतात अशा लोकांना प्रश्न विचारले तर ते नाराज होतात,
त्यांचा मान दुखावतो.

जेथें नाहीं सारासार। तेथें अवघा अंधकार। नाना परीक्षेचा विचार। राहिला तेथें॥



जेथे योग्य अयोग्य काय त्याचा विचार नाही, सारासार विचाराचा अभाव आहे, सदसदविवेक बुद्धी नाही अशा ठिकाणी अंधकार असतो. समर्थ म्हणतात अशा माणासाला निरनिराळ्या परीक्षा करून ज्ञान प्राप्त करून घेण्याचे सुचतच नाही.

प्रत्ययज्ञाता सावधान। त्याचें ऐकावें निरूपण। आत्मसाक्षात्काराची खूण। तत्काळ बाणे॥ वेडें वांकडें जाणावें। आंधळें पाउलीं वोळखावें। बाश्कळ बोलणें सांडावें। वमक जैसें॥


प्रत्यक्ष अनुभव आहे काय, तो किती आहे, कसा आहे इत्यादीची माहिती करावी. त्याची सांगड निरूपणाच्या विषयाशी घालावी. ज्याला आत्मसाक्षात्कार झाला आहे असा माणूस तत्काळ ओळखता येतो कारण त्याच्या चाली वरून अनुभव आणि अभ्यासाची सांगड दिसते. त्याचा मार्ग स्पष्टपणे दिसतो.  वेडें वांकडे कोण आहे हे ओळखावे. अशांचे बाश्कळ म्हणजे वाह्यात बोलणे सांडावे म्हाणजे सोडावे ज्याप्रमाणे ओकारी आपण सोडतो.

नवविधा भजन बोलिलें। तेंचि पुढें प्रांजळ केलें। श्रोतीं अवधान दिधलें। पाहिजे आतां॥

नवविधा भजन बोलिलें। तेंचि पुढें प्रांजळ केलें। श्रोतीं अवधान दिधलें। पाहिजे आतां॥
भक्ती शब्द तीन प्रकारें सिद्ध होतो असे के.वि.बेलसरे लिहितात. भजनं भक्ति:, भागो भक्ति:, भंजनं भक्ति:. भजन म्हणजे रस घेणे, रसस्वादन करणे. आपल्याकडे नऊ रस सांगितले आहेत. रस्यत इति रस: = ज्याचा आस्वाद घेतला जातो तो रस. भरताचे नाट्यशास्त्र हा रसप्रिक्रियेचे स्वरूप सांगणारा पहिला ग्रंथ मानतात. पण भरताच्याही आधी द्रुहिण व वासुकी या दोन आचार्यांच्या दोन भिन्न रसपरंपरा होत्या असे डॉ ग.त्र्यं. देशपांडे यांनी म्हटले आहे.
विभावानुभावसंचारिसंयोगाद्रसनिष्पत्ति:
विभाव, अनुभाव व संचारी भाव यांच्या संयोगातून रसनिष्पत्ती होते. येथे निष्पत्ती म्हणजे अभिव्यक्ती, उत्पत्ती, पूर्णता अथवा परिपक्वता असा आहे. भाव हे स्थायिन अथवा व्यभिचारिन असतात. स्थायिन भाव आठ अथवा नऊ प्रकारचे असतात कारण रस हे आठ अथवा नऊ प्रकारचे असतात त्यानुसार स्थायी भाव ठरतात. व्यभिचारिन भाव तेहेत्तीस अथवा त्रेचाळीस असतात. विभाव: म्हणजे शरीराची अथवा मनाची विशिष्ट अवस्था. संचारणे अथवा संचरणे म्हणजे फिरणे, जाणे.  
जे सर्वश्रेष्ठ आहे त्याची भक्ती करावी. आपल्याकडे तत्त्वज्ञानात परमेश्वर संकल्पिलेला आहे. तो कधी विष्णुरूप आहे, कधी शिवरूप आहे, कधी कोणा एखाद्या संत महात्म्याच्या रूपात आहे. मात्र भक्तीचा अधिकार आणि उपास्य निवडण्याचे बंधन कोणावरही नाही. आपल्याला हवी त्याची आपण भक्ती करू शकतो. भक्तीचे नऊ प्रकार सांगितले आहेत.
श्रवणं कीर्तनं विष्णो: स्मरणं पादसेवनम।
अर्चनं वन्दनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम॥
हे नऊ प्रकार वैष्णवांनी अथवा भागवत धर्मियांनी सांगितले आहेत म्हणून त्यात विष्णूचा उल्लेख आला आहे. मात्र आपल्या उपास्याची भक्ती करीत असतांना आपल्याला हे नऊ प्रकार अनुभवास येतात.