Tuesday, 22 November 2011

जैसें समुद्री लवण न पडे। तंव वेगळें अल्प आवडे। मग होय सिंधूचि एवढें। मिळे तेव्हां॥


जैसें समुद्री लवण न पडे। तंव वेगळें अल्प आवडे। 
मग होय सिंधूचि एवढें। मिळे तेव्हां॥

समुद्रात लवण म्हणजे मीठ पडत नाही तोपर्यंत ते मीठ एवढेसे वाटते. मात्र तेच आणि तेवढेसेच मीठ जेव्हा समुद्रात, सिंधूत पडते, तेव्हा ते
समुद्राएवढे होते. मोठे आणि लहान याबाबत आपल्यात खूप संभ्रम असतो. आपल्यापेक्षा मोठा नेमका कोण? लहान कोण? एकीकडे अमेरिका आणि दुसरीकडे चीन यांमध्ये आपण नेमके मोठे की लहान? त्याचबरोबर एखाद्यासारखे होणे वाईट की चांगले? अनुकरणानेच जर आपण शिकत असू तर एखाद्याचे अनुकरण करणे वाईट कसे असेल? अनुकरण हे अंधानुकरण नेमके कधी होते? अनुकरणाची सांस्कृतिक गरज असते काय? एखाद्या
संस्कृतीत अनुकरण करण्याला प्रोत्साहन दिले जाते तर एखाद्या संस्कृतीत अनुकरणाला वाईट मानले जाते? यात माध्यमांचा नेमका वापर कसा होतो?

तरी ज्ञानयज्ञु तो एवंरूपु। तेथ आदिसंकल्पु हा यूपु। महाभूतें मंडपु। भेदु तो पशु।


तरी ज्ञानयज्ञु तो एवंरूपु। तेथ आदिसंकल्पु हा यूपु।
 महाभूतें मंडपु। भेदु तो पशु।
ज्ञानयज्ञ कसा आहे याचे रूपकांतून निरुपण माउली येथे करीत आहे. ज्ञानाच्या बाबतीत जगभरातील तत्त्वज्ञान्यांनी विविध मते मांडली आहेत. याचे कारण पूर्वापार पासून ज्ञानाचे स्वरूप काय आहे, ज्ञान कशाला म्हणावे याबाबत मत भिन्नता आहे. माध्यमांची सध्याची अवस्था ही त्या दृष्टीने अपरिपक्व आहे कारण ज्ञान आणि माहिती यात माध्यमे माहिती अमाप देत आहेत मात्र तेवढेच ज्ञानही देत आहेत असे म्हणता येणार नाही. परंतु ज्ञानाची व्याख्या जर त्या त्या समाजाची वेगवेगळी असेल तर ते ज्ञान द्यावे तरी कसे? आपल्या शिकण्याच्या आणि शिकवण्याच्या पद्धतीतही ज्ञानाच्या बाबतीत संभ्रम, संदिग्धता दिसते काय?

माउली म्हणते ज्ञानयज्ञामध्ये मूळ संकल्प हा पशु किंवा यूपु बांधावयाचा खांब आहे; पंच महाभूतें हा मांडव आहे व द्वैत हा पशु आहे. त्यापुढे पंच महाभूतांचे जे शब्दस्पर्शादि विशेषे गुण, अथवा इंद्रिये व प्राण, हीच यज्ञाची साहित्यसामग्री असून, अज्ञान हे तूप आहे. तेथे मन व बुद्धि या कुंडांत प्रज्वलित ज्ञानरूपी अग्नि असून, सुखदु:खादि इंद्रांविषयी जी चित्ताची समता, ती वेदी. आत्मानात्मविचार करण्याविषयींची जी बुद्धीची कुशलता, तीच मंत्रविद्येची शोभा आहे. शांति ही स्रुक्स्रुवा नावांची यज्ञपात्रे आहेत व जीव हा यज्ञ करणारा आहे.

जैसें अंगाचेनि सुंदरपणें। लेणियासी आंगचि होय लेणे। अळंकारिलें कवण कवणें। हे निर्वचना॥

जैसें अंगाचेनि सुंदरपणें। लेणियासी आंगचि होय लेणे। 
अळंकारिलें कवण कवणें। हे निर्वचना॥
  

एखादे सुंदर शरीर आहे आणि त्यावर सुंदर असे अलंकार चढविले आहेत तर शरीरामुळे अलंकार की
अलंकारांमुळे शरीर सुंदर दिसेल? की सुंदरता द्विगुणित होईल? कोण कोणास शोभेल? या
ओवीत माउली गीता आणि स्वत:ची त्यावरील टीका यांची तुलना करीत आहे. सौंदर्य म्हणजे नेमके काय या विषयावर जगभरात खूप उहापोह झाला आहे. कारण सौंदर्य उपजत, नैसर्गिक असते असे म्हटले तर सगळे काही सुंदर आहे असे म्हणावे लागेल. मात्र सौंदर्य ही एक सामाजिक संरचना अथवा मानवी बांधणी आहे असे म्हटले तर सौंदर्याचे निकष त्या त्या समाजातून वेगवेगळे असतील, व्यक्तिनिष्ठ असतील.
सौंदर्यावरील समाजाची भूमिका आपल्या समाजातील सृजनता दर्शवते काय? एखाद्या समाजात सुंदर कोणाला म्हटले जाते, कशाला म्हटले जाते यावरून त्या समाजावरील प्रभाव ओळखता येतील काय?